‘दिल्ली पोलिसांनी माझे कपडे फाडले,’ काँग्रेसच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप, शशी थरुर यांनी शेअर केला व्हिडीओ

नॅशनल हेराल्डशी निगडित कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी, सलग तिसऱ्या दिवशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची चौकशी केली. ही चौकशी सुरू असताना दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलनही कायम होते. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे बडे नेतेमंडळी उपस्थित होते. मात्र हे आंदोलन हाताळताना दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे नेते आणि काही खासदारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला केला जातोय. असाच एक व्हिडीओ काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी शेअर केला असून या व्हिडीओमध्ये एका महिला खासदाराने खासदाराने पोलिसांनी त्यांचे कपडे फाडल्याचा आरोप केला आहे.

थरुर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तामिळनाडू येथील जोथिमणी या महिला खासदार दिसत आहेत. त्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून बोलत आहेत. दिल्ली पोलिसांनी माझ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत व्हिडीओमध्ये त्या आपले फाटलेले कपडे दाखवताना दिसत आहेत. “मी तामिळनाडू राज्यातील एक खासदार आहे. दिल्ली पोलिसांनी आमच्यासोबत अमानुषपणे व्यवहार केला आहे. पोलिसांनी काल आणि आजदेखील आमचा छळ केला आहे. त्यांनी माझे कपडे फाडले आहेत. एका खासदाराचे त्यांनी कपडे फाडले आहेत. तसेच माझी चप्पलदेखील त्यांनी काढून घेतली. दिल्ली पोलिसांनी माझ्याशी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे व्यवहार केला,” असा आरोप खासदार जोथिमणी यांनी केला आहे.

तसेच या व्हिडीओमध्ये, “पोलीस आम्हाला अनोळख्या ठिकाणी घेऊन जात आहेत. त्यांनी आम्हाला पाणीदेखील दिलेले नाही. आम्ही पाणी खरेदी करायला गेलो तर दुकानदारांना आम्हाला पाणी देऊ दिलं गेलं नाही. एका महिला खासदारासोबत असं घडत आहे,” असा गंभीर आरोप जोथिमणी यांनी केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून दिल्ली पोलिसांवर टीका केली जात आहे.

हाच व्हिडीओ काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. “हे लोकशाहीमध्ये अपमानास्पद आहे. महिला आंदोलकांशी असे वागणे म्हणजे शिष्टाचारांचे उल्लंघन आहे. दिल्ली पोलिसांच्या या वर्तनाचा मी निषेध करतो, असं थरुर या ट्वीटमध्य म्हणाले आहेत. तसेच या घटनेची दिल्ली पोलिसांनी जबाबदारी स्वीकारावी; लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी थरुर यांनी केली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा धारण करत राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply