दाभोलकर, हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी पूर्ण

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी (ता. १२) पूर्ण झाली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यांच्यासह अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशा पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. या घटनेचा साक्षीदार असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्याची मार्च महिन्यात साक्ष नोंदविण्यात आली होती.

डॉ. दाभोलकर यांच्यावर यांच्यावर अंदुरे आणि कळसकर यांनी गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरारी झाले, अशी साक्ष या कर्मचाऱ्याने नोंदवली होती. त्यावर बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळसिंगीकर, अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त यांनी गेल्या तीन सुनावण्यांमध्ये या साक्षीदाराची उलटतपासणी घेतली. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत सहा साक्षीदार न्यायालयासमोर सादर केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे. डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरची साक्ष आणि उलटतपासणी पुढील सुनावणीत नोंदविण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply