दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातून पीएफआयचे १६ जण ताब्यात, राज्यात कोठे छापेमारी?

एनआएने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापेमारी केली आहे. यात महाराष्ट्रातील कार्यालयांचाही समावेश आहे. या कारवाईत महाराष्ट्रातून पीएफआयच्या जवळपास १६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएने एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.

एनआयएने पुण्यातील कोंढवा परिसरात सर्वे नंबर ५ येथे अश्रफ नगरमध्ये छापेमारी केली. यावेळी सीआरपीएफचे जवानही हजर होते. गुरुवारी (२२ सप्टेंबर) सकाळी ही कारवाई करण्यात आली. यात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. याशिवाय औरंगाबादमधील जिन्सी भागातून चौघांना आणि परभणीतून चौघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर २३ येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयात राष्ट्रीय तपास विभागाने पहाटे धाड टाकली होती. यातून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

अतिरेकी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. असे असले तरी नेरुळ सेक्टर २३ दारावे गाव या गावठाण भागात त्यांचे कार्यालय आहे . या ठिकाणी राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्या नंतर तब्बल ७ तासांच्या तपासणी नंतर ४ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक व्यक्ती याच परिसरातील रहिवासी असल्याचेही बोलले जाते.

कार्यालय असलेला परिसरसात दैनंदिन गरजा भागावणारी दुकाने आहेत मात्र सदर घटने नंतर या कार्यालय आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्यांच्या बाबत सर्वांनी मौन बाळगले आहे. या ठिकाणी सहा ते सात जण कायम संगणकावर काम करीत असतात कोणीही फारसे बोलत नाही कामाशी काम अशा पद्धतीने काम चालते. अशी माहिती येथे येणाऱ्या एका व्यक्तीने दिली.

दहशतवाद विरोधी पथकाचा मालेगावात छापा, एकास अटक

दहशतवाद विरोधी पथकाने गुरूवारी भल्या पहाटे केलेल्या कारवाईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) चा येथील म्होरक्या सैफु रहेमान यास ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद कृत्यांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यात सैफु याचे नाव पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या छापेमारीबद्दल अत्यंत गोपनीयता पाळली जात असली तरी सैफु यास ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला आहे. सैफु हा ‘पीएफआय’ या धार्मिक संघटनेचा नाशिक जिल्हा प्रमुख असून या संघटनेचा राज्य पदाधिकारी म्हणूनही तो जबाबदारी सांभाळत असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील हुडको कॉलनी भागात सैफु हा वास्तव्यास आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. यात काही आक्षेपार्ह मजकूर असलेली पुस्तके जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply