तोतया डॉक्टरपासून सावधान! ‘ससून’मधील रुग्णांच्या नातेवाइकांना पैशांसाठी फोन

पुणे - ससूनमधून ‘आरएमओ’ (RMO) बोलतोय. तुमच्या रुग्णाला तातडीने औषध द्यावी लागत आहेत. ती ससूनमध्ये नाहीत. तसेच, ती रुग्णालयाच्या परिसरातील दुकानांमध्येही नाही. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथून लवकर या आणि औषधे आणा. साडेतीन हजार रुपयांची ही औषधे आहेत. पैसे ‘कॅश’ द्या किंवा ‘ऑनलाइन’ पाठवा,’ असा फोन आल्यास तुम्ही सावध व्हा. असा फोन ससूनमधून कोणीही आरएमओ करत नाही. तर तुमचे पैसे उकळायला बसलेला तोतया डॉक्टर करतो. या फोनवरून कोणीही पैसे देऊ नका किंवा ऑनलाइन पाठवू नका, असे आवाहनही ससून रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ससून रुग्णालयात हजारांहून जास्त रुग्ण वेगवेगळ्या आजाराच्या उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांच्या नातेवाइकांना असा फोन येतो. विशेषतः ज्यांचे रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत आहेत. त्यांना फोन करण्यात येतात, असे निरीक्षण टिपण्यात आले आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) बोलत असल्याचे फोनवरून रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले जाते. रुग्णाला तातडीने जीवरक्षक औषधांची गरज आहे. ती ससून रुग्णालयात मिळत नाहीत. ती बाहेरून आणावी लागतील. त्यासाठी साडेतीन हजार रुपये खर्च आहे. औषधे लवकर द्यायची आहेत. तुम्ही औषधांचे पैसे कॅश देणार की ऑनलाइन असा प्रश्न समोरचा व्यक्ती आवर्जून विचारतो. या बाबत ससून रुग्णालय प्रशासनासाठी संपर्क साधला असता, फोनवरून सांगितलेल्या नावाचा कोणताही ‘आरएमओ’ रुग्णालयात नाही, हे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची फसवणुकीचे प्रकार उघड झाले होते. त्या बाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले आता पुन्हा नव्या स्वरूपात हे प्रकार सुरू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मोबाईल नंबर बाहेर जातोच कसा? ससून रुग्णालयात रुग्णांचा केस पेपर काढताना तेथे जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल क्रमांक दिला जातो. हा मोबाईल क्रमांक रुग्णालयाच्या व्यवस्थेतून बाहेर जातो कसा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. खात्री करा पैसे देण्यापूर्वी तुम्ही रुग्णावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून औषधे लागणार आहेतच याची न चुकता खात्री करा. संबंधित औषधे रुग्णाला कशासाठी वापरण्यात येणार आहे, ते विचारा.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply