तुकोबांच्या पालखीचे भक्तीमय वातावारणात उद्योगनगरीत स्वागत; आकुर्डीतील मुक्कामानंतर बुधवारी पुण्याकडे प्रस्थान

पिंपरी: जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) दुपारी अतिशय भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात रात्री पालखीचा मुक्काम होता. बुधवारी (२२ जून) सकाळी तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

मंगळवारी सकाळी श्रीक्षेत्र देहूतून पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दुपारी चारनंतर पालखीचे आगमन झाले. यावेळी शहरवासियांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार महेश लांडगे, पालिका आयुक्त राजेश पाटील, माजी महापौर माई ढोरे, राहुल जाधव, नितीन काळजे, नामदेव ढाके, राजू मिसाळ, सचिन चिखले, सुरेश भोईर, बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी पालिकेसह राजकीय पक्षांच्या वतीने पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना पाणी, खाद्यपदार्थ, भेटवस्तू, फराळाचे साहित्य आदींचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रथमोपचार पेटी व पालिकेची माहिती असलेली पुस्तिका भेट देण्यात आली. महापालिकेने स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी तयार केलेल्या स्वच्छता चित्ररथाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम होता. यानिमित्त महापालिका तसेच ग्रामस्थांच्या वतीने विविध सोयीसुविधा उपलब्ध देण्यात आल्या होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत होते.

आकुर्डीत तुकोबांची पालखी मुक्कामी पोहोचली, तेव्हा परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी पाच वाजता खंडीत झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली. महावितरण कार्यालयात अनेकांनी दूरध्वनी केले. प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत या भागातील माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी अधिकाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply