“ठाण्यातील राडा मुख्यमंत्र्यांवर लांछन”; अरविंद सावंतांची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, याचा शिंदे यांना त्रास होतो आहे”

सोमवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याचे समोर आले. याठिकाणी ठाकरे गटाचे नेते राजन विचारेदेखील उपस्थित होते. त्यांच्यावरही पाण्याची बॉटल फेकण्यात आली होती. दरम्यान, या वादावरून ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

यादंर्भात बोलताना, कालचा ठाण्यातील प्रकार मुख्यमंत्र्यांवर मोठं लांछन आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. तसेच शिंदे गटातील लोकांनी राजन विचारे यांच्यावर हल्ला केला. माझ्या मतदारसंघात माझ्या विरोधात माणसं उभी राहतात, याचा शिंदे यांना त्रास होतो आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेवरून ठाकरे गट सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला, त्यालाही अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. शिंदे गटातून धादांत खोटं बोलण्यात येत आहे. काल जो राडा झाला, त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे समर्थक उपस्थित होते. त्यापैकी स्थानिक कार्यकर्ते कमी, तर बाहेरून आलेली लोकं जास्त होती, असेही ते म्हणाले.

किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे ही उपस्थित होते. त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply