जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा पोलिसांना इशारा, म्हणाल्या “आरोप सिद्ध करू शकले नाही तर तर आम्ही पोलिसांविरोधातही कायदेशीर कारवाई करणार आहोत.”

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर आव्हाड यांनी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे विधान केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षासह आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आव्हाड यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाही, तर आम्ही पोलिसांनादेखील कोर्टात खेचणार, असे ऋता आव्हाड यांनी सांगितले आहे. त्या आज (१४ नोव्हेंबर) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

“जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला फक्त बाजूला केलेले आहे. या महिलेविरोधात गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न करणे या आरोपांखाली आम्ही तक्रार दाखल केली आहे. आपली लोकशाही एवढी खालच्या पातळीवर गेली आहे. आपल्या विरोधकांना हतबल करण्यासाठी कोणताही दुसरा मार्ग नसल्यामुळे महिलेचा उपयोग केला जात आहे,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केली.

“छट पूजेच्या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांची समाधी बांधायची आहे का? असे वक्तव्य याच महिलेने केले होते. याच कारणामुळे आमच्या कार्यकर्त्या आणि त्यांच्यात बाचाबाची झाली होती. या महिलेसह, महिलेची मुलगी आणि दोन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत,” असेदेखील ऋता गायकवाड यांनी सांगितले.

“जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा पोलिसांनी सिद्ध करून दाखवावा. आम्ही आता दोन ते तीन ठिकाणी स्क्रीन लावणार आहोत. आमचा आमदार किती बाईवेडा आहे, हे लोकांना कळू देत. हजार लोकांमध्ये ते एखाद्या महिलेचा विनयभंग करतात हे लोकांना कळू देत. मात्र हे कोर्टात सिद्ध झालं नाही, तर आम्ही पोलिसांविरोधातही कायदेशीर कारवाई करणार आहोत. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस विरोधकांना खोटे गुन्हे दाखल करून अडकवत असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा ऋता आव्हाड यांनी घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply