चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राजू काळेंची चर्चा, डिपॉझिटसाठी आणली १० हजारांची चिल्लर; रक्कम मोजताना अधिकाऱ्यांची दमछाक!

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. आज (७ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी राजू काळे हेदेखील अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी अनामत रक्कम म्हणून चक्क दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. याच कारणामुळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले.

२ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी राजू काळे यांनी अनामत रक्कम म्हणून १० हजारांची चिल्लर आणली होती. यामध्ये १ रुपया, २ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. याच कारणामळे निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांना अनामत रक्कम मोजताना चांगलीच कसरत करावी लागली.

किमान अर्धा तास चिल्लर मोजण्याचे काम सुरू

शेवटी काही काळ सर्वच अधिकारी चिल्लर मोजत बसले आणि मोजणी पूर्ण केली. किमान अर्धा तास चिल्लर मोजण्याचे काम सुरू होते. तशी माहिती अपक्ष उमेदवार राजू काळे यांनी दिली. आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना उर्फ विठ्ठल काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply