गोवा : मुसळधार पावसामुळे गोव्यात हाहाकार! दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या ४० पर्यटकांना वाचवण्यात यश

गोवा : ऑक्टोबर संपत आला मात्र अद्याप पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुट्टीचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवालाही पावसाचा तडाखा बसला आहे. दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आणि येथील पूलही पाण्यात वाहून गेला. यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास ४० पर्यटक अडकले होते. दरम्यान राज्य सरकारने तैनात केलेल्या जवानांनी या पर्यटकांची सुटका केली आहे.

ही घटना शुक्रवारी १४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी घडली. यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘मांडवी नदीची पातळी वाढल्यामुळे नदीवरील पूल पाण्यात वाहून गेला. यामुळे जवळपास ४० पर्यटक दूधसागर धबधब्याजवळ अडकले होते.’ पूल नसल्याने हे पर्यटक नदी पार करण्यास असमर्थ होते. तथापि, राज्य सरकारने पाठवलेल्या सुरक्षा जवानांनी या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या जवानांचे कौतुक केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढून पूल वाहून गेला. यानंतर दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या ४० पर्यटकांना सुरक्षा जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. पर्यटकांना वाचवल्याबद्दल मी या सुरक्षा रक्षकांची आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.”

महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. पुण्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अहमदनगर येथील सीना नदीचे पाणी पुलापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुण्यासह इतर अनेक राज्यांना अलर्ट जारी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply