गुजरातमधून बाहेर काढलेल्या परप्रांतीयांबाबत कोण माफी मागणार?; अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी ही सभा पार पडली. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला होता. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली त्यानंतर पुण्यामध्ये अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर अयोध्येला येऊ देणार नाही हे प्रकरण सुरु झाले. मी हे पाहत होतो. मला उत्तर प्रदेशातूनही माहिती मिळाली. एक वेळ अशी आली की मला समजले की हा सापळा आहे आणि यामध्ये अडकले नाही पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. ज्यांना माझी अयोध्यावारी खुपली त्यांनी सगळ्यांनी मिळून हा आराखडा आखला,” असे राज ठाकरे म्हणाले.

“मला रामजन्मभूमीचे दर्शन घ्यायचे होतेच पण जिथे कारसेवकांना मारले गेले तिथल्या जागेचेही दर्शन घ्यायचे होते. राजकारणामध्ये अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने ठरवले असते तर महाराष्ट्रातून हजारो मनसैनिक अयोध्येला आले असते. तिथे जर काही झाले असते तर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. ऐन निवडणुकीच्या वेळी हे काढले असते आणि इथे त्यावेळी कोणीच नसते. हा सगळा सापळा होता. एक खासदार उठून मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला.

“मी जात नाही म्हटल्यावर चार शिव्या खायला तयार आहे. पण माझे कार्यकर्ते अडकवू देणार नाही. राज ठाकरेंनी माफी मागावी याची आत्ता जागा आली का? २०१७ मध्ये गुजरातमध्ये उत्तर प्रदेश बिहारमधले लोक कामासाठी गेले होते त्यापैकी कोणाकडून स्थानिक मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर तिथल्या उत्तर प्रदेश बिहारमधील नागरिकांना मारण्यात आले आणि १० ते १५ हजार लोकांना गुजरातमधून हकलून दिले. ते मुंबईमध्ये येऊन परत उत्तर प्रदेशात गेले. तिकडे त्यांना मारण्यात आले, गुजरातमधून बाहेर काढण्यात आले तर तिथून कोण माफी मागणार आहे. म्हणून तुम्ही हे राजकारण समजून घेतले पाहिजे,” असेही राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply