कोल्हापूर / सांगली : पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली,अलमट्टी धरणातून 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर / सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. तर कर्नाटकात अलमट्टी धरणातून 75 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीत पूरस्थितीमुळे अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी पुन्हा एकदा झपाट्यानं वाढताना दिसतेय. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 33 फूट 9 इंच इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 50 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेत. त्यामुळे या बंधाऱ्याहून होणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. 

दरम्यान,  सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, शिराळा तालुक्यातील मांगले - सावर्डे बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फूट झाली आहे.

राज्यात 14 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. हा रेड अलर्ट विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. तर  नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंट अलर्ट दिलाय.  नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्यानं आता गोदावरीची पूरस्थिती आणखी गंभीर होत आहे.
 
नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती कायम आहे. जिल्ह्यातल्या महत्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरु असल्यानं शहरातल्या रामकुंड परिसरातल्या मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आहे. प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झालाय. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 66 टक्के भरलंय. गंगापूर धरणातून 10 हजार क्युसेकने विसर्गही सुरू झालाय.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply