कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार – दिलीप वळसे पाटील

पुणे - कोणालाही कुठली लढाई लढायची असेल तर, त्यांनी ती कायदेशीर लढली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. कायदा हातात घेतला तर, त्याविरोधात पोलिस नियमाप्रमाणे कारवाई करतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी (ता. २६) भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव न घेता, त्यांना उद्देशून वक्तव्य केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. कोण कोठे जातोय, याचा ट्रॅक ठेवत नाही. परंतु, स्थानिक पोलिस कायद्याप्रमाणे काम आणि कारवाई करतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. पेन ड्राइव्हच्या माध्यमातून सभागृहात खोटे-नाटे आरोप करायची नवी पद्धत विरोधकांनी काढली आहे. याच्या माध्यमातून खोटे-नाटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, जो संबंध नाही तो जोडायचा, त्यामधून सरकारबद्दल वातावरण बदलायचा किंवा बिघडवायचा प्रयत्न करायचा, एका बाजूला कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला छोट्या गोष्टीवरून मोठे मोर्चे काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, अशी चुकीची नीती विरोधक वापरू लागले आहेत.

परंतु त्यांच्या कारस्थानांमुळे सरकारची प्रतिमा बिघडणार नाही. राज्य सरकार अतिशय पारदर्शी पद्धतीने काम करत आहे आणि भविष्यातही करत राहील, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. पुणे शहरात घडत असलेल्या गुन्हेगारीच्या घटना चिंताजनक आहेत. याबाबत पुणे पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply