औरंगाबाद : शोरूम फोडून १५ लाख लंपास!

औरंगाबाद : अदालत रस्त्यावरील पगारिया दुचाकी, चारचाकी ऑटो शोरूमवर दरोडा टाकून अवघ्या २३ मिनिटांत दरोडोखोरांनी दोन तिजोऱ्या लंपास केल्या. पैशांनी भरलेल्या तिजोऱ्या गोलवाडी-तीसगाव शिवारात फोडून त्यातील १५ लाख ४३ हजार २४७ रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे एक ते १ः४७ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

यासंदर्भात क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारिया ऑटो शोरूममध्ये ॲडमिन म्हणून कार्यरत असलेले अभिषेक अमिताब रॉय (४१, रा. कांचनवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बुधवारी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर रात्री १० च्या सुमारास सुरक्षारक्षकांनी शोरूमचे शटर डाऊन केले. त्यानंतर सर्व चाव्या व्यवस्थापक कमलेश मुनोत यांच्याकडे देण्यात आल्या. त्यानंतर तिथून सर्वजण घरी गेले. तिथे राजेंद्र सोनवणे आणि रावअण्णा गारेल्लू हे रात्रपाळीसाठी दोन सुरक्षारक्षक तैनात होते.

दोन सुरक्षारक्षक तैनात होते, दरम्यान रात्री ११ वाजेनंतर पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते दोघे चारचाकी विक्री विभागाच्या बाजूने एक समोर आणि दुसरा पाठीमागे जाऊन बसले. पाऊस असल्याने ते सुरक्षित स्थळी बसले होते. ज्या बाजूने सुरक्षा रक्षक नाही त्या बाजूने पहाटे एक वाजून दहा मिनिटांनी पाच दरोडेखोर आले. त्यांनी दुचाकी विक्रीच्या बाजूचे शटर उचकटले. चार दरोडेखोर शोरूममध्ये घुसले. इकडे-तिकडे काहीही न उचकता ते थेट तिजोरी असलेल्या कॅश काऊंटरकडे गेले. तेथे काही मिनिटे त्यांनी काच खोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच उघडत नसल्यामुळे त्यांनी टॉमीने काच फोडली. त्यानंतर दोन्ही तिजोऱ्या तेथून उचलल्या.

दरोडेखोरांनी समोरच असलेल्या पॅन्ट्री रूमच्या खिडकीच्या काचा फोडून तिजोऱ्या बाहेर काढल्या. तेथून त्या बाजूलाच असलेल्या मोकळ्या मैदानात फेकल्या. काही मिनिटे तेथे तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे तिजोरी फोडणे शक्य झाले नाही. शोरूमच्या बाजूच्या मैदानात काही वेळ तिजोऱ्या फोडण्याचा दरोडेखोरांनी प्रयत्न केला. मात्र, तेथे त्यांना तिजोऱ्या फुटल्या नाहीत. त्यात आवाज होऊ लागल्यामुळे त्यांनी चारचाकीने दोन्ही तिजोऱ्या वाळूज रस्त्यावरील गोलवाडी शिवारात छावणी उड्डाणपुलाच्या बाजूला नेल्या. तेथे मोठ-मोठे दगड घालून तिजोऱ्या फोडल्या आणि त्यातील १५ लाख ४३ हजार २४७ रुपये काढून ते पसार झाले.

रिकाम्या तिजोऱ्या त्याच ठिकाणी टाकून दरोडेखोर पसार झाले. सकाळी या ठिकाणी रिकाम्या तिजोऱ्या आढळल्यावर पोलिसांनी तिकडेही धाव घेतली होती. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता सुरक्षा रक्षकांना जाग आल्यानंतर त्यांनी शोरूमला चोहोबाजूने चक्कर मारली. तेव्हा दुचाकी विक्रीच्या बाजूचे शटर उचकटलेले दिसले. हा प्रकार त्यांनी तत्काळ रॉय यांना फोनवरून कळविला. रॉय तत्काळ शोरूमला आले.

त्यांनी लगेचच क्रांती चौक पोलिसांना माहिती दिली. त्यावर उपनिरीक्षक विकास खटके यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनीही घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विशाल इंगळे यांनी गुन्हा दाखल केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply