औरंगाबाद : प्रशासकांनी ३५ दिवसांत घेतले तब्बल ५० ठराव!

औरंगाबाद : महापालिकेतून बदलून गेलेले प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बदलीच्या पहिल्या आदेशानंतर म्हणजेच २९ जून ते एक ऑगस्ट या ३५ दिवसांत तब्बल ५० ठराव मंजूर केले आहेत. त्यात अनेक महत्त्वाच्या ठरावांचा समावेश असून, या ठरावांचे कंपोजिंग सुरू आहेत. त्यामुळे प्रती देण्यास वेळ लागेल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

महापालिकेत आस्तिककुमार पांडेय यांनी दोन वर्षे आठ महिने काम केले. एप्रिल २०२० मध्ये नगरसेवकांची मुदत संपली व कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर श्री. पांडेय यांची शासनाने प्रशासक म्हणून नियुक्ती केली. प्रशासकीय कार्यकाळात प्रशासकांनी ४९८ ठराव मंजूर केले आहेत. त्यातील ४४८ ठरावांचे यापूर्वी वाटप करण्यात आले होते. मात्र अद्याप ५० ठरावांमध्ये काय दडलंय हे समोर आलेले नाही. विशेष म्हणजे हे ठराव श्री. पांडेय यांची बदली झाल्यानंतर घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाने सुरवातीला श्री. पांडेय यांची २९ जूनला बदली केली होती. पण त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली. पण दोन आठवड्यांनंतर पुन्हा बदलीचे आदेश निघाले. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी (ता. दोन) नवे आयुक्त म्हणून पदभार घेतला. गेल्या ३५ दिवसांत श्री. पांडेय यांनी तब्बल ५० ठराव घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्या काळातील शेवटच्या ठरावाची ४९८ क्रमांकाची नोंद झाली असल्याचे नगर सचिव विभागातर्फे सांगण्यात आले. या ठरावांच्या प्रतींची मागणी केली असता, सध्या कंपोजिंग सुरू असल्याचे सांगण्यात आले. अनेक महत्त्वाचे विषय ठरावांमध्ये असल्याने लपवाछपवी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

क्रमांकांमध्ये सोडला गॅप

या ठरावाध्ये श्रीहरी पॅव्हेलियन, राकाज् क्लबच्या ठरावांचा देखील समावेश असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. काही ठराव आर्थिक विषयांचे असून, या ठरावांच्या क्रमांकांमध्ये गॅप सोडण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही ठराव नंतर घुसवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply