पुणे : एआरएआय’ तर्फे पुणे जिल्ह्यातील प्रदूषकांची ‘उत्सर्जन यादी’ प्रसिद्ध

पुणे : पुण्यातील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ( एआरएआय) या संस्थेतर्फे जिल्ह्यातील हवेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारी प्रदूषके आणि त्यांचे स्रोत यांचा समावेश असलेली उत्सर्जन यादी (एमिशन इनव्हेनटरी) तयार करण्यात आली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि पुणे महापालिका ( पीएमसी ) यांना हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक कृती आराखडा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. देशातील लखनौ, कानपूर, नाशिक आणि पुणे या चार शहरांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

नवी दिल्ली येथील ‘तेरी’ संस्थेच्या नेतृत्वाखाली स्वित्झर्लंड येथील स्विस एजन्सी फॉर डेव्हलमेंट अँड को – ऑपरेशन (एसडीसी) संस्थेने या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचे सहाय्य करण्यात आले आहे. सोमवारी ‘एआरएआय’ चे वरिष्ठ उपसंचालक आनंद देशपांडे, डॉ. एस. एस. ठिपसे, महाव्यवस्थापक मौक्तिक बावसे यांनी एका विशेष परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध केला. या ‘उत्सर्जन यादी’ चे काम २०२१ मध्ये करण्यात आले. जिल्ह्यात हवेच्या प्रदूषणासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारी पाच प्रमुख प्रदूषके निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये पीएम २.५, पीएम १०, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि ऑक्साइड ऑफ नायट्रोजन या प्रदूषकांचा समावेश आहे. या अभ्यासाचे परीक्षण कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक मुकेश शर्मा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिरॉलॉजीचे (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे यांनी केले आहे.

डॉ. एस. एस. ठिपसे म्हणाले, कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एआरएआय ई २० या इंधन प्रकारावर काम करत आहे. हे इंधन पेट्रोल आणि इथेनॉलचे २० टक्के मिश्रण आहे. यामुळे जैव इंधनाचा प्रसार होऊन, उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होणे शक्य आहे. आनंद देशपांडे म्हणाले, पुणे शहरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकी आणि बसेसच्या मागणीत वाढ होणे हे चित्र सकारात्मक आहे.

प्रदूषके आणि कारणे

  • उद्योग क्षेत्रातून ८४ टक्के सल्फर डायऑक्साइड, १८ टक्के कार्बन मोनॉक्साईड तयार होतो.
  • वाहतूक क्षेत्रामुळे २० टक्के पीएम २.५, ६१ टक्के कार्बन मोनॉक्साईड तर ७१ टक्के नायट्रोजन ऑक्साईड तयार होतो.
  • कृषी कचरा जाळल्याने १० टक्के पीएम २.५, पाच टक्के कार्बन मोनॉक्साईड निर्माण होतो.
  • बांधकाम आणि संबंधित क्षेत्रामुळे २३ टक्के एवढा पीएम १० तर १२ टक्के पीएम २.५ उत्सर्जित होतात.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply