उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदाराचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

Shivsena Uddhav Thackeray vs CM Eknath Shinde : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विले पार्ले भागातील प्रभावशाली नेते तसेच ठाकरे गटाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पक्षाला रामराम केला आहे. हेगडे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी आपल्या शेकडो समर्थकांसह हेगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी भेट घेऊन त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्याकडून हेगडे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्तीही करण्यात आली. कृष्णा हेगडे यांचा काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता बाळासाहेंबाची शिवसेना राजकीय प्रवास राहिलेला आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. सुरूवातीला आमदार, त्यानंतर खासदार आणि आता थेट पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. एकीकडे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नव्याने पक्षबांधणीची तयारी करत असताना अचानक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे गटाची वाट धरल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, मुंबईतील विलेपार्लेतील ठाकरे गटाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात प्रवेश करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालिसासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे ह्या देखील उपस्थित होत्या.

माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा मुंबईतील विले पार्ले भागात विशेष प्रभाव आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. सुरूवातीला ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते.

मात्र, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाल्यानं कृष्णा हेगडे यांनी नवा मार्ग स्वीकारला होता. हेगडेंनी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी भाजप प्रवेश केला होता. मात्र, काही दिवसानंतर हेगडेंनी भाजपची साथ सोडून शिवसेनेची वाट धरली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply