“आधी नितीन गडकरी, आता देवेंद्र फडणवीस; भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण”; ब्राह्मण महासंघाचा गंभीर आरोप

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या सरकारमध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा अंदाज लावला जात होता. भाजपाकडूनही सकाळी ट्विटर हँडलवर मी पुन्हा येईन हा फडणवीसांचा जुना डायलॉग असलेला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. मात्र, ऐनवेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि मी सरकारच्या बाहेर राहून सरकारच्या पाठिशी असेन, असं जाहीर केलं. मात्र, अचानक राजकीय घडामोडी घडून फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीसांचं खच्चीकरण केल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलाय. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी याबाबत निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली.

डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले, “भाजपामध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण होत आहे. पंतप्रधान पदाच्या स्पर्धामधून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचं चारित्र्य हनन करून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपातील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड रोखण्यासाठी बहुमतापेक्षा अधिक संख्येने युतीचे आमदार निवडून आणल्यानंतरही सरकार न बनविण्याचं षडयंत्र आखण्यात आलं. योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून लांब ठेवण्यात आले.”

“भाजपा वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला”

“आत्ता फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत पोहचविले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविले. त्यानंतर भाजपातील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. यातून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आलं,” असा आरोप गोविंद कुलकर्णी यांनी केला.

“ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान”

“भाजपामध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चाललं आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे,” असंही कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply