“आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा”, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारं मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी मंडळींनी ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र केलं आहे. दर रविवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अलीकडेच झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी नव्या सरकारवर टीका केली होती.

या आंदोलनात अनेक अल्पवयीन मुलांनी सहभाग घेतला होता. याच मुद्यावरून आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं मुंबई पोलिसांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत योग्य ती कारवाई करून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगानं दिले आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं की, “मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमधील अल्पवयीन मुलांचा वापर ‘आरे वाचवा’ आंदोलनासाठी केला आहे. याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहे. संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून केली जात आहे.”

हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे पाठवावा, असंही संबंधित नोटीसमध्ये म्हटलं आहे. आमचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प आहेत. कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे. येथे एकाच ठिकाणी चार कारशेड निर्माण करता येतील. त्यामुळे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असं आदित्य ठाकरे संबंधित आंदोलनात म्हटलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply