अहमदनगर : अकोलेत अजित पवार यांची गाडी अडवत जाब विचारला, शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतल्याचा निषेध

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार आज अहमदनगरला दाखल झाले. परंतु सभास्थळी जाण्यापूर्वी मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडाळाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रस्त्यात थांबवून जाब विचारला. विधानसभा निवडणुकीत त्यांचं (सीताराम गायकर) धोतर फेडणार अशी भाषणं केली, त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही कसे आलात? असं आंदोलक म्हणाले. सोबतच शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले आणि अजित पवार सभास्थळी पोहोचले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर हे मधुकरराव पिचड यांच्या समवेत होते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत सीताराम गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. अकोले इथे सभास्थळी जातानाच पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणी भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यात गाडी थांबवत जाब विचारला. "विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर यांचं धोतर फेडणार अशी भाषणं केली होती. आम्ही लहामटे यांना मते दिली. मग आज तुम्ही सीताराम गायकर यांच्यासाठी प्रचाराला कसे आलात?" असं आंदोलक म्हणाले. 

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतून शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या परिवर्तन पॅनलने माघार घेत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांना विरोध म्हणून पाठिंबा दिल्याचे दशरथ सावंत यांनी सांगितलं. दशरथ सावंत म्हणाले की, "जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मी अजित पवार यांच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली होती. मात्र अगस्ती कारखाना निवडणुकीत सीताराम गायकर यांना नेतृत्व आणि उमेदवारी देऊ नये या अटीवर ही माघार झाली घेतली होती. परंतु दशरथ सावंत यांनी माघार घेण्यासाठी काहीतरी घेतलं असं सीताराम गायकर यांचे समर्थ बोलतात. त्यामुळे प्रचारासाठी येणाऱ्या अजित पवार यांना जाब विचारण्यासाठी मी स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर जाऊ दिले नाही तर तालुक्याला माझे प्रेत दिसेल". 

परंतु अजित पवार यांच्या सभेच्या आधीच पोलिसांनी सकाळीच दशरथ सावंत यांना ताब्यात घेतलं. त्याचा सुद्धा अजित पवार यांच्यासमोर निषेध करण्यात आला. यावेळी पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply