अफगाणिस्तानची राजधानी काबूल हादरली! शाळेजवळ बॉम्बस्फोट, 6 जणांचा मृत्यू

 

अफगाणिस्तानची  राजधानी काबूल पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी काबूलच्या पश्चिम भागात एका शाळेजवळ दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी झाले आहेत अशी माहिती मिळत आहे. काबूलच्या दस्ता-बर्ची परिसरात हा स्फोट झाला आहे. 

सूत्रांनी सांगितले की, दुसरा स्फोट अब्दुरहिम शाहिद हायस्कूलजवळ झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली आहे, याबाबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.

तालिबान अफगाणिस्तानात शिरल्यापासून इस्लामिक स्टेट सक्रिय झाले आहे. दहशतवादी संघटना देशातील शिया लोकसंख्येला लक्ष्य करत आहे. शिया मुस्लिमांच्या मशिदींवर हल्ले केले जात आहेत. तर, तालिबानचे म्हणणे आहे की, त्यांच्या सरकारने देशातील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी काम केले आहे. त्यामुळे आता देशात दहशतवादी घटना कमी होत आहेत. मात्र अफगाणिस्तानच्या विविध भागात वारंवार दहशतवादी हल्ले होणे सुरूच आहे. अफगाणिस्तानमध्ये 'इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान प्रांत' या नावाने इस्लामिक स्टेट सक्रिय आहे. ते तालिबानलाही लक्ष्य करतात.

तत्पूर्वी, एप्रिलच्या सुरुवातीला काबूलमधील सर्वात मोठ्या मशिदीत दुपारच्या नमाजाच्या वेळी हातबॉम्बचा स्फोट होऊन किमान सहा जण जखमी झाले होते. पोलिसांच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. जुन्या काबूल शहराच्या मध्यभागी असलेल्या अठराव्या शतकातील पुल-ए-खिश्ती मशिदीवर हा हल्ला करण्यात आला होता.

तसेच या हल्ल्यापूर्वी 4 एप्रिल रोजी याच परिसरात आणखी एक ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यांची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाहीये. तर बाजारपेठेत झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर 59 जण जखमी झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply