अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून दिलासा! ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०१ कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केले आहेत.

जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर १३ हजार ६०० रुपये, बागायत पिकांसाठी २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर ३६ हजारांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. तीन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून नागरिकांना हा आर्थिक दिलासा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना वाढीव मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील जवळपास २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यातील १८ जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील १२ हजार ७८८ हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply