५० हजार पगार आणि दीड कोटींचं घर, छापा पडताच प्यायलं विष, घरात ८५ लाख रुपये सापडल्यानंतर अधिकारीही चक्रावले

मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सरकारी लिपिकाच्या घरी छापा टाकून तब्बल ८५ लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांना बेहिशोबी मालमत्तेसंबंधी तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घरामध्ये तपास असतानाच लिपिकाने विषारी द्रव्य पाशन केलं असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

महिन्याला ५० हजार पगार असणाऱ्या अप्पर विभागाचे लिपिक केसवानी यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रंही सापडली आहेत, ज्यामधून करोडोंची संपत्ती खरेदी केल्याचं स्पष्ट होत आहे.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत अधिकाऱ्यांकडून शोधमोहीम सुरु होती. घरामध्ये पैशांचा ढीग सापडल्यानंतर पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीनदेखील आणली होती.

पोलीस अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) राजेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य वैद्यकीय विभागात कार्यरत असणाऱ्या या लिपिकाने तपास पथक घरी पोहोचताच बाथरुम क्लिनर प्राशन केलं अशी माहिती दिली आहे. केसवानी याने पोलिसांना घऱात येण्यापासून रोखत धक्काबुक्कीदेखील केली.

“त्याला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. उच्च रक्तदाबाशी संबंधित काही आरोग्य समस्या असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत,” असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे.

संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांना घरात ८५ लाखांची रोख रक्कम सापडली. याशिवाय करोडोंची किंमत असणाऱ्या संपत्तीची कागदपत्रंही हाती लागली आहेत. एकूण चार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसवानी राहत असलेल्या घराचीच किंमत दीड कोटी आहे. चार हजार महिना पगारापासून सुरुवात करणारा केसवानी सध्या ५० हजार प्रतीमहिना पगार घेत होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply