साताऱ्यासह कराड, खटावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं गारपिटीसह हजेरी लावलीय.

साताऱ्यासह कराड, खटावमध्ये कडाक्याचे ऊन असतानाच अचानक ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली, तर नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाळी थंड वातावरणामुळं नागरिकांना उष्णतेतून दिलासा मिळाला.

मागील काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. ४० अंशांच्या वर पारा जात आहे. कडाक्याच्या उन्हामुळं होरपळून निघालेल्या, तसेच या लाटेनं हैराण झालेल्या जनतेला आज शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने दिलासा दिला. मात्र, पावसामुळं गारवा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

दुपारी तीनच्या आसपास खटाव व आजूबाजूच्या गावांना पावसानं चांगलंच झोडपलं. जाखणगावमध्ये अर्धा तास हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जांब, बिटलेवाडी, आमलेवाडी, कोकराळे आदी अनेक गावांत शेतात काढून ठेवलेला गहू, हरभरा, कांदा भिजला आहे.

तसंच जनावरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान झालंय. घराच्या भिंती, पत्रे यांचंही नुकसान झालंय. कांदा, टोमॅटो पिकांसह आंब्याचं मोठं नुकसान झालं असून काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्यानं विजेचे खांबही भुईसपाट झालेत. त्यामुळं परिसरातील वीजपुरवठा गायब झालाय.

सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व त्यासोबत मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांची धांदल उडालीय. मात्र, दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या पावसानं हैराण झालेल्या नागरिकांनी दिलासा मिळालाय.

सध्या शेतात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरूय. एकीकडं कांद्याचे दर उतरले आहेत. याची चिंता शेतकऱ्याला लागली असतानाच कांदा काढणीच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांची मात्र पुरती तारांबळ उडाली आहे. वादळामुळं साताऱ्यासह खटावमध्ये विद्युत पुरवठा बंद झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply