सांगवी, गॅस स्फोट प्रकरणातील फरार आरोपींना अटक

माळेगाव - गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार झालेले सांगवी (ता. बारामती) येथील गॅस स्फोट प्रकरणातील मुख्य दोन आरोपींना पकडण्यात आज पोलिसांना यश आले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात पकडलेल्या आरोपींमध्ये सचिन अरविंद गव्हाणे (वय 42) व नितीन अरविंद गव्हाणे (वय 38 , दोघे रा. सांगवी, ता. बारामती) यांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपासाधिकारी राहुल घुगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सांगवी गावच्या लोकवस्तीमध्ये शनिवार (ता. १९ मार्च) रोजी गॅस स्फोट झाला होता. विशेषतः भारत गॅस एजन्शीधारकाच्या घरातच घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस बेकायदा व्यवसायिक टाकीत भरताना वरील घटना घडली होती. या प्रकरणी महसूल विभागातील पुरवठा शाखेचे संजय शिवाप्पा स्वामी यांच्या फिर्य़ादीनुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये भारत गॅसचे वितरक व निर्मल अरूण एजन्शीचे संचालक सचिन गव्हाणे, नितीन गव्हाणे व गौरी गव्हाणे यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तूचा गैरवापर करणे आदी कलमान्वये पोलिसांनी कारवाई केली होती.

परंतु वरील संशयित आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाले होते. एक महिनाचा कालावधी उलटून गेला असतानाही आरोपींना अटक न झाल्याने गावात संतापजणक वातावरण होते. दरम्यानच्या कालावधीत संबंधित आरोपींनी सांगवी येथील गॅस स्फोट प्रकरणात आपल्या वकिलामार्फत अटक पुर्व जामिन अर्ज मांडला असता अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमुर्ती एस,पी.भालेराव यांनी नाकारला होता. या प्राप्त स्थितीचा विचार करता संबंधित आरोपींना अटक करण्यासाठी वरीष्ठ न्यायालयाचा निर्णय महत्वपुर्ण ठरला.

याबाबत पोलिस अधिकारी श्री. घुगे यांनी सांगितले की सांगवी गावातील गॅस स्फोट प्रकरण गंभीर आहे. महसूल विभागाच्या मदतीने आम्ही आरोपींवर कडक कारवाई होण्यासंबंधी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना पकडल्याने वरील प्रकरणाचा खोलवर तपास करणे सोपे झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply