सांगली : रोज दीड तास भ्रमणध्वनी, दूरचित्रवाणी बंद! ; सांगलीतील ‘मोहित्यांचे वडगाव’ गावाचा अभूतपूर्व निर्णय

सांगली : रोजचा रतीब घालावा तशा असलेल्या दूरचित्रवाणीवरील मालिका आणि समाज माध्यमातील आभासी जगातील चित्रफिती यांमुळे मुलांची अभ्यासातील कमी झालेली रुची वाढविण्यासाठी रोज सायंकाळी दीड तास भ्रमणध्वनी व दूरचित्रवाणी संच बंद ठेवण्याचा निर्णय कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावने घेतला आहे. या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. कडेगाव तालुक्यातील ३ हजार १०५ लोकसंख्येचे मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झाले आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळली. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शाळेच्या पटसंख्येवर झाला. याचा विचार करण्यासाठी सरपंच विजय मोहिते यांनी १४ ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. यावेळी महिलांनी मुलांच्या अभ्यासाचा विषय मांडला.

यावर विचार करण्याची गरज प्रत्येकाला वाटत होती. मुले एकतर भ्रमणध्वनीवर तासन्तास असतात, तर घरात मोक्याच्या वेळी महिला करमणुकीच्या नावावर छोटय़ा पडद्यावरील आभासी मालिका पाहण्यात गुंतलेल्या असतात, हे समोर आले. यातूनच रोज सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत घरातील दूरचित्रवाणी आणि भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची लगेचच १५ ऑगस्टपासून अंमलबजावणीही करण्याचे निश्चित करण्यात आले. वेळेची आठवण करून देण्यासाठी गावातील मंदिरावर भोंगाही लावण्यात आला. 

मुलांना अभ्यासाची आठवण

गावामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारी १३० तर, माध्यमिक शाळेत शिकणारी ४५० मुले आहेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अभ्यास करावा यासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला. या वेळेत मुले घराबाहेर दिसणार नाहीत याची जबाबदारी जशी पालकांवर आहे, तशीच गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या वेळेत जर एखादा मुलगा घराबाहेर आढळला तर त्याला अभ्यासाची आठवण करून दिली जात आहे. यामुळे मुलांना अशी अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे, तशीच महिलांचीही रोजच्या कुटुंबातच कुरघोडय़ा करणाऱ्या दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून मोकळीक मिळाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply