शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी आवाहन केल्यानंतर, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

एसटी कर्मचाऱ्यांना मागे जाण्यासाठी पोलीस विनंती करत आहेत. पण कर्मचारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत. आम्हाला एसटी विलीनीकरण करायचे आहे. आमची मागणी तिच असल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

शरद पवारयांच्या निवासस्थानी सिल्वर ओक या ठिकाणी आंदोनात स्वत: खासदार सुप्रिया सुळे समोर आल्या आहेत. मी सगळ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहे. दगडफेक, चप्पल फेक करुन प्रश्न सुटणार नाही, चर्चा करुया तुम्ही सर्वांनी शांत रहा असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

शरद पवार  यांच्या निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, तरीही आंदोलक कर्मचारी हे शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात घोषणा देत होते.

एसटी कर्मचारी जय श्रीराम च्या घोषणा देत आहेत. आता पुढचं आंदोलन १२ तारखेला १२ वाजता बारामतीमध्ये होणार असल्याचे आंदोलक सांगत आहेत.

निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही

एसटी  महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवाल त्रिसदस्यीय समितीनं दिल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात काल, गुरुवारी सुनावणी होऊन, त्याबाबत निकाल देण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घ्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले होते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. निश्चित कालावधीत कामावर रुजू झाल्यास कारवाई होणार नाही, असं परब (Anil Parab) यांनी सांगितलं होतं.

न्यायालयाच्या निकालानंतर आणि सरकारने केलेल्या आवाहनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधांतरी राहिला होता. संप मागे घेण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली नव्हती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचारी आंदोलन करतील, असे आवाहन केले होते. त्यानंतर आज, शुक्रवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे आक्रमक झालेले दिसले. त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला पवार जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply