विम्बल्डन टेनिस स्पर्धा : किरियॉस प्रथमच उपांत्य फेरीत ; महिलांमध्ये हालेप, रायबाकिनाचे विजय

,लंडन : ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा टेनिसपटू निक किरियॉसने बुधवारी कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिलीच्या ख्रिस्टियन गारिनवर सरळ तीन सेटमध्ये मात केली. तसेच महिलांमध्ये रोमेनियाची सिमोना हालेप व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनीही स्पर्धेत आगेकूच केली.

पुरुष एकेरीच्या सामन्यात किरियॉसने गारिनचा ६-४, ६-३, ७-६ (७-५) असा दोन तास आणि १३ मिनिटांत पराभव केला. आक्रमक शैलीत खेळ करणारा किरियॉस दमदार सव्‍‌र्हिससाठी ओळखला जातो. त्याने गारिनविरुद्धच्या सामन्यात १७ एसेसची (प्रतिस्पर्ध्याला सव्‍‌र्हिस परतवण्यात अपयश) नोंद केली. तसेच त्याने तीन वेळा गारिनची सव्‍‌र्हिसही मोडली. त्यामुळे त्याने सहज हा सामना जिंकला.

त्याचप्रमाणे नवव्या मानांकित ब्रिटनच्या कॅमरून नॉरीने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनवर ३-६, ७-५, २-६, ६-३, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. उपांत्य फेरीत नॉरीला अग्रमानांकित आणि गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचा सामना करावा लागणार आहे.   

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत २०१९च्या विम्बल्डन विजेत्या हालेपने २०व्या मानांकित अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला ६-२, ६-४ असा शह दिला. तसेच १७व्या मानांकित कझाकस्तानच्या रायबाकिनाने ऑस्ट्रेलियाच्या आयला टोमयानोव्हिचवर पिछाडीवरून ४-६, ६-२, ६-३ अशी सरशी साधली. उपांत्य फेरीत हालेप आणि रायबाकिना आमनेसामने येतील. 

जाबेऊरची ऐतिहासिक आगेकूच

टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरने विम्बल्डन स्पर्धेत ऐतिहासिक आगेकूच करताना ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी पहिली अरब महिला ठरण्याचा मान मिळवला. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसऱ्या मानांकित जाबेऊरने बिगरमानांकित चेक प्रजासत्ताकच्या मारी बुझकोव्हावर ३-३, ६-१, ६-१ अशी मात केली. उपांत्य फेरीत तिच्यापुढे जर्मनीच्या तत्जाना मारियाचे आव्हान असेल. मारियाने उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्याच जुल नेमायरला २-६, ६-२, ७-५ असे पराभूत केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply