लोणावळा : खोपोली एक्झिट जवळ द्रुतगतीवर तीन वाहनांचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज सकाळी (गुरुवारी) खोपोली एक्झिटजवळ तीन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले.

सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही. गाड्यांचे मात्र मोठे नुकसान  झाले.  अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या (टीएन ३९ सीएम ९२२७) चालकाचे खोपोली एक्झिट पुढील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने   ट्रकने पुढे जाणाऱ्या आय ट्वेन्टी कारला (एमच ४८ पी ३६८९) मागून धडक दिली,  त्यानंतर पुढच्या  वॅगनार कारला (एमच १२ जीके ४२८६) ले धडक देत काही अंतर फरफटत नेले. यात कार मधील  महिला जखमी झाली. तीला उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर प्रवाशांना प्राथमिक उपचार करत सोडून देण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्सचे जवान मदतीसाठी आल्याने मदतकार्य वेळेत पार पडले. अपघातग्रस्त वाहने लागलीच बाजूला काढल्यामुळे वाहतूक खुली झाली. दुसऱ्या घटनेत खोपोलीजवळील शीळ गावच्या हद्दीत तीव्र उतार व वळणावर भरधाव ट्रेलर पन्नास फुट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. रफिक शेख (वय- ३५, रा. जालना) असे जखमी चालकाचे नाव आहे. त्याच्यावर खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सीट बेल्ट लावल्याने वाचले जीव

गेली दोन महिने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किलोमीटर क्रमांक ४० ते ३६ या पट्ट्यात अपघातांची मालिका सुरू आहे. दोन महिन्यात जवळपास दहा जणांचा अपघातांमध्ये बळी गेला आहे. अपघात व अपघातातील मृतांची संख्या वाढत असताना अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. गुरुवारी (ता.२२) याच पट्यात झालेला अपघात भीषण स्वरूपाचा होता. अपघातात बाधित झालेल्या दोन्ही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्याने जीवितहानी टळली अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply