लव्हिव : रशियाच्या हल्ल्यात मारिउपोल शहरातील शाळेची इमारत पडली ; ढिगाऱ्याखाली शेकडो अडकले

लव्हिव : रशियाच्या हल्ल्याचे केंद्र बनलेल्या युक्रेनमधील मारिउपोल शहरातील शाळेवर आज रशियाच्या सैन्याने बाँबफेक केली. या शाळेत जवळपास चारशे नागरिकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यामुळे शाळेची इमारत पडली असून अनेक नागरिक ढिगाऱ्यांखाली दबले गेले असल्याचा दावा स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे. हा युद्धगुन्हाच असल्याची टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे. नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याबरोबरच रशियाकडून आता विस्थापितांनी आश्रय घेतलेल्या शाळा, रुग्णालये आणि इतर इमारतींवरही हल्ले करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मारिउपोल शहरात गेल्या आठवड्यात रशियाच्या सैन्याने असे अनेक हल्ले केले आहेत. आज त्यांनी येथील एका शाळेच्या इमारतीवर हल्ला केला. शहरावर हल्ला सुरु झाल्यानंतर अनेक जणांनी या शाळेत आश्रय घेतला होता. रशियाच्या रणगाड्यांनी आज शाळेवर तोफगोळ्यांचा मारा केला, त्यावेळी येथे सुमारे चारशे जण आश्रयाला होते. यापैकी अनेक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या शहरावर रशियाने केलेल्या अत्याचारांची आठवण पुढील अनेक शतके काढली जाईल, असा संताप झेलेन्स्की यांनी व्यक्त केला. अझोव्ह समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या मारिउपोल शहराला गेल्या तीन आठवड्यांपासून रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला आहे. या शहराचा पाणी आणि वीज पुरवठा अनेक दिवसांपासून खंडित असून कडाक्याच्या थंडीच्या काळात नागरिकांचे ऊब आणि अन्न-पाण्याविना हाल होत आहेत. रशियाच्या हल्ल्यात या शहरातील किमान २३०० नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मॉस्को : युक्रेनच्या सैन्यतळांना नष्ट करण्यासाठी नव्याने क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आणि त्यामध्ये स्वनातीत क्षेपणास्त्राचा वापर केल्याचा दावा रशियाच्या सैन्याने आज केला. कालही (ता. १९) रशियाने स्वनातीत क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला केला होता. रशियाच्या किंझल स्वनातीत क्षेपणास्त्राने मायकोलेव्ह शहराजवळील एका इंधनाच्या साठ्याला आपला निशाणा बनविले. या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षा १० पट अधिक असून दोन हजार किलोमीटर त्याचा पल्ला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply