म्हाडाचे पशुवैद्यकीय आणि स्त्री रुग्णालय बारगळले; प्रतिसादाअभावी निविदा रद्द

म्हाडा’च्या मुंबई मंडळाने वांद्रे पश्चिम येथे पशुवैद्यकीय रुग्णालय, तसेच ओशिवरा येथे स्त्री रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या भूखंडांवर ही रुग्णालये बांधण्यासाठी इच्छुकांकडून स्वारस्य निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रतिसादाअभावी या निविदा रद्द करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली आहे. परिणामी, या दोन्ही रुग्णालयांचे प्रकल्प बारगळले आहेत.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देणाऱ्या ‘म्हाडा’ने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी गृहप्रकल्पासह वसतिगृह, पशुवैद्यकीय रुग्णालय, स्त्री रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओशिवरा येथील ८८९० चौरस मीटर भूखंडावर स्त्री रुग्णालय बांधण्यासाठी मे महिन्यात स्वारस्य निविदा मागविली होती. तसेच वांद्रे पश्चिम येथील ११२५ चौरस मीटर भूखंडावर पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यासाठी याचदरम्यान स्वारस्य निविदा काढण्यात आल्या होत्या. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या, रुग्णालय बांधण्यास इच्छुक संस्था, कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदेत निवड होणाऱ्या संस्था/कंपनीकडून प्रीमियम घेऊन भाडेतत्त्वावर भूखंड देण्यात येणार होता. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही.

काही संस्था/कंपन्यांनी निविदेसाठी उत्सुकता दाखविली होती. त्यामुळे एकदा निविदांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्यक्षात एकही निविदा सादर झाली नाही. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली आहे. याबाबत पुढील निर्णयासाठी सरकारकडे विचारणा करण्यात येणार आहे. तसेच निविदेला नेमका कशामुळे प्रतिसाद मिळाला नाही, निविदेत काय त्रुटी होत्या याबाबत पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply