मुंबई : २६ किंवा २७ जुलैला होऊ शकतो मंत्रिमंडळाचा विस्तार; २५ ते ३० आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

मुंबई: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती समोर आली होती. काल (गुरुवारी) द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या. यानंतर राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २६ किंवा २७ जुलैला महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात २५ ते ३० आमदारांचा शपथविधी होऊ शकतो. हा शपथविधी राजभवनात होऊ शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे मंत्रिपदांचा नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरू असून, शिंदे आणि फडणवीस यांच्यात बैठका पार पडल्या आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ शकतात. या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होऊ शकते. या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास, लवकरच शपथविधी पार पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास ही पदे भाजपकडे असतील.

तर शिंदे गटाकडे नगरविकास, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग आदी क्षेत्रे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply