मुंबई: भोंगे उत्तर प्रदेशात बंद; महाराष्ट्रात राज ठाकरेंना आनंद, योगींचे मानले आभार

मुंबई: राज्यात भोंग्यांवरुन राजकारण तापलं आहे. अशात उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे हटाव मोहीम हातात घेतली आहे. योगींच्या या मोहीमेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रभावित झाले आहेत. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या भोंगे हटाव मोहिमेचे कौतुक केले असून त्यांचे आभारही मानले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत योगींचं कौतुक केलं आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत. सोबतच मविआ सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर लिहीलं की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत मशिदींवरील भोंगे हटविण्याबाबत भूमिका घेतल्यापासून राज्यातील भोंग्याबाबतच राजकारण तापलं आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक देखील आयोजित केली होती. मात्र, या बैठकी दरम्यान केंद्र सरकारने देशभरातील भोंग्यांबाबत निर्णय घ्यावा असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.

त्यामुळे राज्यात भोंग्याबाबत अजून ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तर ३ मे पर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर मनसे मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवत भोंगे उतरविण्याची माहीम हाती घेईल असा इशारा राज यांनी दिला आहे. राज्यात हे भोंग्याच राजकारण सुरु असताना उत्तर प्रदेशात सरकारने मात्र, भोंग्याविरोधात कडक कारवाई करायला सुरुवात केली असून योगीं सरकारकडून काल संध्याकाळ पर्यंत जवळपास ११ हजार भोंग्यावर कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशात शहरांवरील, रस्त्यांवरील आणि चौकांमधील लाऊडस्पीकरचा आवाज कमी करून ते खाली उतरवण्याचे प्रशासनाने सुरु केलं असून काल संध्याकाळपर्यंत प्रशासनाने धार्मिक स्थळांवरील जवळपास १०,९२३ लाऊडस्पीकर हटवले तर ३५,२२१ लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे

दरम्यान मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात नमाज पठणासाठी लेखी परवानगी मागण्यात आली आहे. औरंगाबादचे वकिल नईम शहाबुद्दीन शेख यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत नमाज पठण करु द्यावे अशी मागणी केली आहे. शिवाजी पार्कपासून काही अंतरावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे. राज ठाकरेंनी मशिदींसमोर भोंगे वाजवण्याची भूमिका घेतली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून वकिल नईम शहाबुद्दीन शेख यांची ही भूमिका असल्याचं बोललं जातंय. विशेष म्हणजे ही परवानगी ३ मे रमजान ईदच्या दिवशी मागण्यात आली आहे. या दिवशी राज ठाकरेंनी सरकारला दिलेला भोंग्याबाबत निर्णय घेण्यासाठीच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply