मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना जामीन मिळणार? सुनील राऊत म्हणाले, “आम्ही आशादायी आहोत.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज ( ९ नोव्हेंबर ) सुनावणी होणार आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात आहेत. राऊत यांच्याकडून अनेक दिवसांपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पीएमएलए न्यायालयाने राऊत यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावर आता संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे आशीर्वाद संजय राऊत यांच्या पाठीमागे आहे. संजय राऊत यांच्या जामीनाबाबत आम्ही आशादायी आहोत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेसाठी जेलमध्ये जाणे पत्करलं, ते कोणासमोर झुकले नाहीत,” असे सुनील राऊत म्हणाले.

दरम्यान, पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तपास यंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्यावतीने करण्यात आला. तर, संजय राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळे न्यायालय संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून जामीन देणार का? हे पाहावे लागणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply