मुंबई : छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे तोतयाच; आशीष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करीत मराठी माणसांवर मुस्लिमांचे राज्य आणण्याचा प्रयत्न करणारेच तोतया असल्याचा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी रविवारी केला. महापालिकेत पंचवीस वर्षे सत्ता असताना विकास कामांवर मते मागण्याऐवजी मुस्लीम तुष्टीकरणाची वेळ का आली आणि मुंबईचा रंग तुम्ही का बदलू पाहात आहात, असा सवालही शेलार यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘जागर मुंबईचा’अभियान सुरू केले असून पहिली सभा वांद्रे पूर्वमध्ये शासकीय वसाहतीतील मैदानात झाली. खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप प्रभारी अतुल भातखळकर, आमदार पराग अळवणी त्यास उपस्थित होते.

शेलार म्हणाले, राजकीय फायद्यासाठी मराठी मुस्लीम संकल्पनेचा प्रचार करीत आहेत. त्यांना मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, मराठी हिंदू या संकल्पना मान्य नाहीत, त्यांच्याशी वैर का? त्यांनी मतांसाठी मुस्लीम तुष्टीकरण सुरू असले तरी मराठी आणि मुस्लीमही भाजपच्याच पाठीशी उभे राहतील. कोकणातील मराठी मुस्लीम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते  सण व उत्सवात आणि सुख दु:खात सहभागी होतात. मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय ? जाती धर्माच्या आधारे मते मागण्याची वेळ का आली, असा सवाल शेलार यांनी ठाकरे यांना केला.

 शेलार म्हणाले, महापालिकेतील बारा हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे काय झाले, हा प्रश्न आम्ही विचारणार. करोनाकाळात किती भ्रष्टाचार केला, याचा जाब मागणार आहोत.  दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध ठेवणारे नवाब मलिक मंत्रिमंडळात होते. महाविकास आघाडी सरकारने जनतेचे नुकसान केल्याची टीका त्यांनी केली.

‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागील सूत्रधाराचा शोध नाही’

ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराचा छडा राज्यात तुमची सत्ता असताना का लावला नाही, असा सवाल खासदार पूनम महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्याचे नाव न घेता या महाभारतातील शकुनी मामा कोण आहे, हे सर्वाना माहीत आहे, असे सांगून महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येचा उल्लेख एका बडय़ा नेत्याने यापूर्वी त्यांना प्रत्युत्तर देताना केल्याची आठवण सांगितली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply