मुंबई : खोणी म्हाडा घरविजेत्यांची प्रतीक्षा संपली; कोकण मंडळ २०१८ सोडत : दोन इमारतींना निवासी दाखला

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१९ मधील सोडतीतील खोणी येथील घरांच्या विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खोणीतील चारपैकी दोन इमारतींना अखेर निवासी दाखला मिळाला असून प्रकल्पासाठी पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात दोन इमारतीतील पात्र विजेत्यांना घरांचा ताबा देण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे.

कोकण मंडळाने २०१८ मध्ये ९०१८ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीतील विजेत्यांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सध्या कोकण मंडळाकडून सुरू आहे. या सोडतीत खोणीमध्ये पंतप्रधान आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २०३२ घरांचा समावेश आहे. कोकण मंडळ कल्याण येथील खोणी परिसरात करीत असलेले चार इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यापैकी इमारत क्रमांक १ आणि ४ चे काम पूर्ण झाले आहे. या इमारतींना निवासी दाखलाही मिळाला आहे. कोकण मंडळाने पाठपुरावा करून पाणीपुरवठय़ाचा प्रश्नही निकालात काढला आहे. या प्रकल्पातील प्रत्येक घरात पाण्याची सोय उपलब्ध झाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निवासी दाखला आणि पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे घराची संपूर्ण रक्कम भरलेल्या १५० विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

२०२१ च्या सोडतीतील घरांच्या कामालाही वेग

खोणीतील अंदाजे २६०२ घरांसाठी २०२१ मध्ये कोकण मंडळाने सोडत काढली होती. या घरांचे कामही वेगात सुरू आहे. या घरांच्या विजेत्यांच्या पात्रता निश्चिती प्रक्रियेला वेग देऊन विजेत्यांना शक्य तितक्या लवकर घरांचा ताबा देण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे.

इमारत क्रमांक १ आणि ४ ला निवासी दाखला मिळाला आहे. आतापर्यंत अंदाजे १५० पात्र विजेत्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यांना घराचा ताबा देण्यासाठी लवकरच पत्र पाठविण्यात येणार आहे. इमारत क्रमांक २ आणि ३ चे कामही वेगात सुरू असून येत्या दोन-तीन महिन्यांत या इमारतींचे बांधकाम पूर्ण होईल.

– नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply