मुंबई : कान्होजी आंग्रे बेट विकास वर्षभरात पूर्ण होणार; मुंबई पोर्ट ट्रस्टची माहिती

मुंबई : सागरमाला योजनेअंतर्गत कान्होजी आंग्रे दीपस्तंभ बेटाचा पर्यटनदृष्ट्या विकास होत असून वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होईल, तसेच मॅलेट बंदरातही मोठा मच्छिमार धक्का बांधला जाईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिली. भारताचा बंदर विकास कार्यक्रम - सागरमाला प्रकल्पाला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांनी नुकतीच पत्रकारांना माहिती दिली.

क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, दीपस्तंभ पर्यटन योजनेअंतर्गत कान्होजी आंग्रे बेटाचा विकास करण्यात येत आहे. हे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत येथे पर्यटकांसाठी १८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. येथे ट्रेकिंग, बसण्याच्या जागा, प्रेक्षक मार्गिका, वेलींचे आणि लाकडाचे मांडव, आराम करण्यासाठी बाके, खुले उपहारगृह, गाणी आणि इतर कलांचे कार्यक्रम, निवासी शिबीर या सोयी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.

मॅलेट बंदरावरील धक्क्यावर दररोज साधारणपणे ७०० ट्रॉलर्स येतात. अनेकदा ही संख्या ९०० पर्यंतही पोहोचते व लवकरच ही संख्या १,३०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मासेमारी बंदर स्थापन करण्यात येणार आहे. त्याचे काम दोन वर्षात पूर्ण होईल, त्यामुळे मच्छिमारांच्या वाढत्या व्यवसायाला साह्य होईल. याशिवाय पिरापाऊ इथे रासायनिक पदार्थांची वाहतूक करणारा तिसरा धक्का बांधला जाणार असून, त्याद्वारे, एलपीजी सारख्या रसायनांची वाहतूक करता येईल, अशीही माहिती जलोटा यांनी दिली.

सागरमाला हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम असून, भारताच्या दळणवळण क्षेत्रात मोठा बदल घडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. भारताचे किनारे आणि जलमार्गांच्या क्षमतेचा संपूर्ण उपयोग करुन घेण्यासाठी यात अनेक विकास प्रकल्प राबविले जात आहेत. सागरमाला योजनेत, एकूण साडेपाच लाखकोटी रुपयांचे प्रकल्प आहेत. त्यापैकी ९९ हजारकोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाले असून २.१२ लाख कोटी रुपयांच्या २१७ प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु असल्याचेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply