मुंबई – आमच्या घरावर हल्ला होतोय, तरीही आम्ही मातोश्रीवर जाणारच – रवी राणा

मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम आहेत. आमच्या घरावर हल्ला होत आहे तरी देखील आम्ही मातोश्रीवर जाणारच असे रवी राणा यांनी फेसबुक लाईव्ह करत सांगितले आहे. आम्ही या घरातून बाहेर पडणार असून आम्हाला काही झाल्यास त्याची जबाबदारी संपूर्ण मुख्यमंत्र्यांवर असणार आहे, असे देखील रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.

आम्हाला पोलिसांनी थांबवले आहे, त्यामुळे आम्ही अद्यापच घरातच आहोत. मात्र, आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणारच, अशी भूमिका रवि राणा यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. मातोश्री हे आमच्यासाठीही मंदिर आहे, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पाईक आहोत. आताची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची उरली नाही. मुख्यमंत्र्यांनीच शिवसैनिकांना आमच्या घराकडे पाठवल्याच गंभीर आरोप देखील रवी राणा यांनी यावेळी केला आहे.

पुढे रवी राणा म्हणाले की, शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले पाहिजे. आता बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक उरले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं असतं असे रवी राणा म्हणाले. शिवसैनिक गुंडगर्दी करत आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने मातोश्रीवर जात आहे. मी त्याठिकाणी महाराष्ट्राच्या शांततेसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी जात असल्याचे राणा यांनी सांगितले. सध्या मुख्यमंत्री मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असल्याचे राणा म्हणाले.

आमच्या घराबाहेर एवढे लोक जमले आहेत, त्यांना काहीही बोलले जात नाहीत. त्यांना का रोखले नाही असा सवाल खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. पोलीस कोणच्या दबाबावाखाली काम करत आहेत. पोलीस प्रशानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा आरोप त्यांनी लगावला. हनुमान चालीसाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढा विरोध का करत आहेत असा सवालही राणा यांनी यावेळी उपस्थित केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply