मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटना भक्कम करण्याचे प्रयत्न

मालेगाव : माजी आमदार शेख रशीद यांच्या राजकीय कारकीर्दीस ४० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शेख यांचा येथे जंगी सत्कार पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने मालेगावातील राजकीय खुंटा अधिक बळकट करण्याचे जोरकस प्रयत्न केल्याचे दिसून आले. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सत्कार सोहळय़ातील शक्तिप्रदर्शन आणि विरोधी एमआयएम पक्षाला केले गेलेले लक्ष्य बघता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशी असेल, याची झलकच या निमित्ताने बघावयास मिळाली.

नगरसेवकापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या शेख रशीद यांनी नंतर नगराध्यक्ष, विधानसभेचे आमदार व शहराचे महापौर अशी पदे भूषविली. शहर काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्षे त्यांच्याकडे होती.  २९ वर्षे विधानसभेत शहराचे प्रतिनिधित्व केलेले निहाल अहमद यांच्यासारख्या बडय़ा समाजवादी नेत्याला पराभूत करण्याची किमया शेख यांनी साधली होती. वेगवेगळय़ा पक्षांमध्ये गोतावळा निर्माण करणारे शेख हे एक मुरब्बी राजकारणी म्हणून परिचित आहेत. माजी आमदार असलेले त्यांचे पुत्र असिफ शेख यांनी गेल्या वर्षी काँग्रेसचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेसला आपलेसे केले होते. त्यापाठोपाठ रशीद शेख यांनी महापौर पत्नी ताहेरा शेख यांच्यासह २८ नगरसेवकांना सोबत घेत काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. घाऊक पद्धतीच्या या पक्षांतरामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष अशी प्रतिमा निर्माण झाली. पक्षाची ही ताकद लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. शेख रशीद यांच्या सत्काराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्याच दृष्टीने संधी साधण्याचा प्रयत्न केला गेला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटात गेलेले बंदरे व खनिकर्म खात्याचे मंत्री दादा भुसे आणि शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख कुटुंबीयांचे राजकीय संबंधही बिनसले आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व भुसेंची शिवसेना यांच्यात सख्य होणे अवघड दिसते. या पार्श्वभूमीवर कुणाचा पािठबा न घेता महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आवश्यक ती रसद पुरविण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचे या सत्कार समारंभात जाणवले.

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून एमआयएमकडे बघितले जाते. त्यामुळे अजित पवार यांनी या समारंभात एमआयएमचे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती यांना लक्ष्य केले. भाजपचे राजकीय भले करण्यासाठी बी टीम म्हणून कार्यरत असल्याचा एमआयएमवर नेहमीच आरोप केला जात असतो. पवार यांनी या आरोपाचा येथे पुनरुच्चार केला. त्यासाठी आमदार मौलाना यांचे भाजपशी कसे सख्य वाढत आहे, याचा दाखला त्यांनी दिला. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी मालेगावचा दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचा पक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यास भाजप व शिंदे गटातील आमदार उपस्थित होते. या व्यासपीठावर आमदार मौलाना मुफ्ती हेदेखील उपस्थित राहिल्याने त्यावेळी शहरात बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. हा धागा पकडत पवार यांनी आपल्या भाषणात मौलानांच्या भूमिकेबद्दलच प्रश्न उपस्थित केला. मौलानांचे भाजप-शिंदे गटाच्या व्यासपीठावर जाणे आणि या पक्षांशी त्यांची वाढणारी सलगी हा जनतेला धोका देण्याचा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली. अजित पवार यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यशैलीवरदेखील टीकास्त्र सोडले. विरोधकांचा आवाज दडपण्याचे आणि जातीयवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेवर अन्याय करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालेगावच्या विकासासाठी केलेल्या कामांचा उल्लेख करत राजकीय व सामाजिक जीवनात शेख रशीद यांनी आजवर बजावलेल्या कामगिरीचा गौरवही त्यांनी आवर्जून केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply