महाराष्ट्र राज्यात पावसाळी वातावरण; तापमानात किंचित घट होण्याची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात गेल्या चोवीस तासांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यानच्या काळात दोन दिवस तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारीही विदर्भात तापमानाचा पारा उच्चांकी (चंद्रपूर- ४५.४ अंश सेल्सिअस) पातळीवर होता. मुंबई परिसरासह कोकणातही तापमानात काही प्रमाणात वाढ दिसून आली.

राज्यात एप्रिलच्या सुरुवातीपासून सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे आहे. उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटा आल्या. सध्या विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, उत्तरेकडील राज्यांसह दक्षिणेकडेही सध्या पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी स्थिती आहे. आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याने पुढील दोन दिवसांत तापमानात घट होणार आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमानात काही प्रमाणात वाढीची शक्यता आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ आणि २४ एप्रिलला हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, मराठवाडय़ातील लातूर, उस्मानाबाद, अकोला, विदर्भातील बुलढाणा, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी २२ ते २४ या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत काही भागांत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply