भारतीय वंशाच्या शीख कुटुंबाची अमेरिकेत हत्या, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह शिरोमणी अकाली दलाने परराष्ट्रमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

भारतीय वंशाच्या शीख कुटुंबातील चार जणांची अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामध्ये हत्या करण्यात आली आहे. या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणात उच्चस्तरीय तपास करण्यात यावा, अशी मागणी मान यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे. अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियात अपहरणानंतर आठ महिन्यांच्या मुलीसह तिचे आई-वडील आणि काकांचा मृतदेह बुधवारी एका फळबागेत आढळून आला होता. या चौघांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह २७ वर्षीय जसलीन कौर, ३६ वर्षीय जसदीप सिंग आणि ३९ वर्षीय अमनदीप सिंग यांची अपहरणानंतर हत्या झाली आहे. हे शीख कुटुंबीय मूळचे पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील हारसी पिंडचे रहिवासी होते. त्यांच्या हत्येबाबत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे. भारतीयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा संबंधित अमेरिकी अधिकाऱ्यांकडे मांडण्याचे आवाहन त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना केले आहे. “आठ महिन्यांच्या आरोहीसह तिच्या कुटुंबियांची निर्घृण हत्या जगभरातील पंजाबी समाजासाठी चिंतेची बाब आहे. हत्येत जीव गमावलेल्या शीख कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो”, अशा आशयाचं ट्वीट बादल यांनी केले आहे.

या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी ४८ वर्षीय मन्युअल सॅलगाडो या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडिताच्या एटीएम कार्डचा वापर केल्यानंतर या आरोपीचा पोलिसांनी छडा लावला आहे. दरम्यान, या कुटुंबाच्या हत्येपूर्वीचा अपहरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. मर्सेड काऊंटी पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. या व्हिडीओत बंदुकीचा धाक दाखवत हल्लेखोराने एका ट्रकिंग कंपनीतून भारतीय वंशाच्या कुटुंबाचे अपहरण केल्याचे दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply