भाज्या आणखी महाग ; परतीच्या पावसाने पिके पाण्यात; आवक घटली

ठाणे, पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यात भाज्यांची आवक घटली असून, दरांत आणखी वाढ झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तयार झालेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात फळभाज्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाज्यांची आवक घटल्याचे चित्र आहे. परिणामी, भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

गवार, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, फरसबी अशा सर्वच भाज्यांचे दर कडाडले आहेत. ऐन सणासुदीत भाज्या कडाडल्याने  सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

भाज्यांचे उत्पादन चांगले होते तेव्हा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज ५०० ते ५५० गाडय़ांतून भाज्यांची आवक होते. मात्र, गेल्या काही दिवसांपाूसन भाज्यांची आवक २५ टक्क्यांनी घटली असून, सध्या वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज ४०० ते ४५० भाज्यांच्या गाडय़ा दाखल होत आहेत.

भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वधारले आहेत. किरकोळ बाजारात गवार १२० रुपये प्रति किलो तर, वाटाणा २५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तसेच फ्लॉवरची विक्रीही १०० रुपये प्रति किलोने करण्यात येत आहे.

४२ लाख शेतकऱ्यांना फटका

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा सुमारे ४२ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आतापर्यंत ३० लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. भाज्यांची आवक पूर्ववत होताच दर कमी होतील.

– शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट, वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply