पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; दोन जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामील

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. यानंतर आता पुण्यात देखील  उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि शरद सोनवणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. सेनेचा मुख्यमंत्री असून देखील आमची कामं होत नव्हती. मतदार संघाच्या विकासासाठी आपण शिंदे गटात सामील झाल्याचं स्पष्टीकरण रमेश कोंडे यांनी दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोंडे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघ असो किंवा इतर कोणताही मतदारसंघ असो, त्याठिकाणी शिवसैनिकांची कामं बऱ्यापैकी अडचणीची आहेत. अलीकडेच पुणे महानगर पालिकेत ३४ गावं समाविष्ठ झाली. याठिकाणी पूर्वी ग्रामपंचायती असताना लोकांनी बांधकामं केली होती. या गावांत आता अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी लगेच सांगितलं, PMRDA आणि पुणे महानगर पालिकेशी बोलतो. नाला, रस्ता अशा सार्वजानिक ठिकाणांची बांधकामं वगळता कोणत्याही बांधकामांना धक्का लागणार नाही. अशाप्रकारची ग्वाही त्यांनी काल पहिल्याच भेटीत दिली आहे. गोरगरीबांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत मांडता येतात. मांडलेले प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका आहे. यावर तात्काळ कारवाई होईल आणि बऱ्यापैकी हा प्रश्न मार्गी लागेल. आपण सांगितलेलं काम ते करतील, अशी अपेक्षा मला आहे. माझ्यापेक्षा येथील मतदारांना आणि महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असंही कोंडे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply