पुणे : सुझलॉन एनर्जी’चे संस्थापक तुलसी तांती यांचे निधन ; देशात पवन ऊर्जा क्षेत्राची पायाभरणी

पुणे : अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक तुलसी तांती (६४ वर्षे) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले.

तुलसी तांती हे अहमदाबाद येथून आपला उद्योग चालवित असले, तरी ते २००४ पासून पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे मुलगा प्रणव आणि मुलगी निधी असा परिवार आहे. भारतात अक्षय ऊर्जेची संकल्पना रुजवून ऊर्जा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात त्यांचे मोठे योगदान होते. ‘विंड मॅन ऑफ इंडिया’ अशी त्यांची ओळख होती.

सुझलॉन’ समूहाने यासंदर्भात दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तुलसी तांती यांचे निधन झाले. पुण्यात दाखल झाल्यानंतर तांती यांचे हृदयक्रिया बंद पडल्याने निधन झाले. तांती यांचा जन्म राजकोट (गुजरात) येथे २ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. १९९५ मध्ये पवनऊर्जा प्रकल्पासाठी ‘सुझलॉन एनर्जी’ची स्थापना केली. त्यांच्या निधनामुळे ‘सुझलॉन’ समूहाला मोठा धक्का बसला आहे. ‘सुझलॉन एनर्जी’ ही देशातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाची ऊर्जानिर्मिती कंपनी आहे. भारतातील पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनीचा वाटा ३३ टक्के आहे. तर, ही कंपनी जगातील १७ देशांत कार्यरत आहे. तांती हे ‘रिन्यूएबल एनर्जी काऊन्सिल ऑफ कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’चेही अध्यक्ष होते.

तांती यांनी अक्षय ऊर्जा वापराबद्दलच्या धोरण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (एफआयसीसीआय) व कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजमध्ये (सीआयआय) या संदर्भात त्यांची सक्रिय भूमिका होती. ‘इंडियन विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

उद्योजकांच्या विविध संस्थांचेही ते सक्रिय सदस्य होते. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

संयुक्त राष्ट्रांतर्फे ‘चॅम्पियन ऑफ द इयर’, २००६ मध्ये ‘अर्न्‍स्ट अँड यंग’चा ‘ आंत्रप्रुनिअर ऑफ द इयर’ व जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाचा ‘हिरो ऑफ द एन्व्हायर्नमेंट’ आदी अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

तांती हे शनिवारी अहमदाबादमध्ये होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांना त्यांनी सांगितले होते, की कंपनीच्या १२०० कोटींच्या अग्रहक्क भागांबाबत ११ ऑक्टोबर रोजी घोषणा करतील. ‘सुझलॉन एनर्जी’ वरील कर्जाची परतफेड करण्यासंदर्भातील पावले उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते.

देशाच्या प्रगतीत मोठे योगदान-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसी तांती यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रद्धांजली वाहताना मोदींनी नमूद केले, की भारताच्या आर्थिक प्रगतीत तांती यांचे महत्त्वाचे योगदान होते. देशातील अग्रगण्य उद्योजकांत त्यांचा समावेश होता. तांती यांनी भारतातील पवन ऊर्जा क्षेत्राची पायाभरणी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply