पुणे : सिंहगड रस्त्यावर पुन्हा एकदा कोयता गॅंगचा हैदोस

पुणे : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितल्याने काही सराईतांनी हातात कोयते व तलवार घेऊन दहशत माजवविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या सराईतांनी संबंधित महिलेलाही मारहाण केली असून लहान मुलाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती व लहान मुले बाहेर खेळत होती. रस्त्यावरुन दुचाकीवरून काही तरुण वेगाने ये-जा करत होते. महिलेने मुलं खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा म्हणून सांगितले असता त्याचा राग धरुन त्या तरुणांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा काही वेळात हातात तलवार व कोयते घेऊन ते तरुण इतरांना सोबत घेऊन आले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करु लागले.

या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला असून संबंधित तरुण हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. दरम्यान गावातील एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी या सराईतांनी त्याला धमकावल्याचीही महिती मिळाली आहे. गांजाची नशा करुन हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात अशी माहिती एका संतप्त नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

"हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याची व इतर माहिती मिळाली आहे. तातडीने आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. अशा समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे." सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *