पुणे-सातारा रस्त्यावर पुणेकरांची बेकायदा वसुली आणि खेड शिवापूरचा टोलविरोधात पुण्यातील ४६ संघटना रस्त्यावर

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर पुणेकरांची बेकायदा वसुली थांबविण्यात यावी आणि खेड शिवापूरचा टोलनाकाच हटविण्यात यावा, अशी मागणी करीत विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह ४६ संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कात्रज चौकात धरणे आंदोलन आणि नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबिवण्यात आली. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचा भाग असलेल्या पुणे ते सातारा या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू करण्यात आले होते. रिलायन्स इन्फ्रा कंपनीकडून सातत्याने हे काम रखडत गेले. मार्च २०१३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ते १२ वर्षांनंतर अद्यापही पूर्ण झालेले नाही. याबाबत आंदोलने आणि सातत्याने तक्रारी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी ठेकेदाराकडून टोलवसुलीचा ठेका काढून घेण्यात आला असून, आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोलची वसुली करण्यात येत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात नोंद झालेल्या वाहनांना खेड शिवापूर टोल टाक्यावर टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अंमलबजावणीही झाली. मात्र, रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण नसताना गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही शहरातील वाहनांकडून पुन्हा टोलवसुली करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुणेकरांना २० किलोमीटरसाठी १०० किलोमीटरचा टोल भरावा लागत असून नियमानुसार ही टोलवसुली चुकीची असल्याचे मत व्यक्त करीत त्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरुवात म्हणून कात्रज चौकात १ मे रोजी नागरिकांच्या सह्यांची मोहीम आणि धरणे आंदोलन करण्यात आले. पुणेकरांचा टोल बंद करावा आणि खेड शिवापूरचा टोलनाका हटविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक अंकित यादव यांनी खेड शिवापूर टोल हटाव समितीचे निमंत्रक माउली दारवटकर यांच्याकडून आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले. आमदार भीमराव तापकीर यांनी यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. ऑल इंडीया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे बाबा शिंदे, काँग्रेसचे अभय छाजेड, शैलेश सोनावणे, मनसेचे विलास बोरगे, डॉ. संजय जगताप, आम आदमी पक्षाचे विजय कुंभार, माजी महापौर दत्ता धनकवडे तसेच विशाल तांबे, युवराज बेलदरे, बाळासाहेब धनकवडे, वर्षां तापकीर, महेश वाबळे, अप्पा रेणुसे, सुधीर कोंढरे, नितीन कदम, राजेंद्र कोंढरे, संतोष फरांदे, सचिन कोळी, शहाजी आरसुळ, राजेंद्र कुंजीर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply