पुणे : सागरी शोध, टेहळणी मोहिमेत नौदलातील महिलांची यशस्वी झेप ; पोरबंदर येथील इंडियन नेव्हल एअर एन्क्लेव्हचे यश

पुणे : पोरबंदर येथे वसलेल्या इंडियन नेव्हल एअर एन्क्लेव्हच्या पाच महिला अधिकाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्रात संपूर्ण महिला सागरी शोध आणि देखरेख मोहीम यशस्वी करून एक नवा इतिहास रचला आहे. डॉर्नियर – २२८ या विमानाच्या मदतीने ही मोहीम यशस्वी करण्यात आली आहे. लेफ्टनंट कमांडर आंचल शर्मा यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या संघामध्ये पायलट लेफ्टनंट शिवांगी, लेफ्टनंट अपूर्वा गिते, लेफ्टनंट पूजा पांडा आणि सब लेफ्टनंट पूजा शेखावत यांचा समावेश होता. गुजरात राज्यातील पोरबंदर येथे इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन वसलेली आहे.

अत्याधुनिक डॉर्नियर -२२८ या सागरी टेहळणी विमानांचा या स्क्वॉड्रनमध्ये समावेश आहे. कमांडर एस. के. गोयल या स्क्वॉड्रनचे नेतृत्व करतात. बुधवारी (३ ऑगस्ट) या महिला अधिकाऱ्यांच्या चमूने आपली मोहीम यशस्वी केली. कठोर प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकांचा या मोहिमेच्या पूर्वतयारीमध्ये समावेश होता. सशस्त्र दलांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कामी भारतीय नौदल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून नौदलात महिलांचा समावेश करणे, महिला वैमानिकांची नियुक्ती करणे, महिला हवाई संचालन अधिकारी निवड, तसेच २०१८ मध्ये महिला नौकानयन मोहिमेसारख्या अनेक कार्यक्रमांतून भारतीय नौदलाने हे दाखवून दिले आहे.

उत्तर अरबी समुद्रातील सागरी शोध आणि टेहळणी मोहिमेसाठी संपूर्ण महिला चमूची निवड करणे हा अनोखा उपक्रम होता. सैन्यदलांच्या विमान वाहतूक विभागातील महिला अधिकाऱ्यांना जबाबदारीची पदे आणि आव्हानात्मक भूमिका मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होण्याची अपेक्षा आहे. सागरी शोध आणि टेहळणी मोहिमेसाठीची हवाई मोहीम केवळ महिला अधिकाऱ्यांतर्फे यशस्वी होणे हे सशस्त्र दलांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आणि यश असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply