पुणे : वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने जीएसटी अधिकाऱ्याची आठ लाखांची फसवणूक

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने वस्तू आणि सेवाकर कार्यालयातील (जीएसटी) अधिकाऱ्याची आठ लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी एका महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुग्धा उर्फ मिताली हेमंत कुलकर्णी (रा. कल्याण, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत जीएसटी कार्यालयातील अधिकाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार अधिकारी आणि आरोपी मुग्धा कुलकर्णी यांची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्या वेळी कुलकर्णीने वकील असल्याचे त्यांना सांगितले होते. न्यायाधीश परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बतावणी तिने त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर कुलकर्णी आणि तक्रारदार अधिकाऱ्याचा संवाद वाढला. तक्रारदार अधिकाऱ्याच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष कुलकर्णीने दाखविले होते.

त्यानंतर रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने अधिकाऱ्याकडून कुलकर्णीने पैसे घेतले. आठ लाख दोन हजार रुपये कुलकर्णीला दिल्यानंतर अधिकाऱ्याच्या मुलीला वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply