पुणे : विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर

पुणे : विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे शुक्रवारी (९ सप्टेंबर) मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता केळकर रस्ता परिसरात मंडळांनी विसर्जन सोहळ्यासाठी तयार केलेले देखाव्यांचे रथ लावले होते. मध्यरात्रीनंतर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बांबुचे अडथळे उभे करण्यात आले. विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनीवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई नाचत असल्याचे पाहायला मिळाले. बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्च क्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता.

ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ‌ठरले होते.

दणदणाटामुळे पोलीसही हतबल

गेले दोन वर्ष करोना संसर्गामुळे विसर्जन मिरवणूक निघाली नव्हती. यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने विसर्जन मार्गावरील बहुतांश मंडळांनी उच्चक्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती.  ‌ढोल ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळनंतर झालेल्या गर्दीमुळे विसर्जन मार्गावरुन चालणे देखील अवघड झाले होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply