पुणे : वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्तांकडूनच चाप

पुणे : वाहतुक नियमनाऐवजी दंडात्मक कारवाईवर भर देणाऱ्या वाहतुक पोलिसांच्या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चांगलाच चाप लावला आहे. वाहतुक पोलिसांकडून केल्या जाणारी टोईंगची कारवाई व रस्त्याला उभे राहून पावत्या फाडण्याचे प्रकार पुढील आदेश येईपर्यंत थांबवावेत, अशा सुचना वाहतुक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह रस्ता, मेट्रोची कामे सुरु असणाऱ्या ठिकाणी वाहतुक कोंडीचे प्रकार घडत आहेत. असे असतानाही संबंधित वाहतुक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन करण्याऐवजी रस्त्याच्याकडेला थांबून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असल्याच्या घटना अजूनही सुरु आहेत.

वाहतुक पोलिसांकडून मनमानी पद्धतीने दंडाची आकारणी करण्यापासून तोडपाणी करण्यापर्यंतचे प्रकार घडत आहेत. त्यातच टोईंग वाहनावरील पोलिस कर्मचाऱ्यासह कामगारांकडूनही वाहने उचलताना वाहनचालकांशी हुज्जत घालण्याचे, त्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार घडले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे नागरीक अक्षरशः त्रस्त आहेत. याबाबतच्या तक्रारी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेत त्यांनी टोईंगची कारवाई व रस्त्याच्याकडेला थांबून पावत्या फाडण्याचे प्रकार थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
एखादे वाहन वाहतुकीला अडथळा ठरत असेल, तर त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करुन ते पोलिस उपायुक्तांना पाठवावे, त्यांच्या परवानगीनेच संबंधित वाहनांवर पुढील कारवाई करावी, अशाही सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान,वाहतुक पोलिसांबाबतच्या तक्रारींची आता विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे. संबंधित चौकशीत दोषी आढळणाऱ्या टोईंग वाहन चालक, मालक किंवा वाहतुक पोलिस कर्मचारी यांच्यावरील जबाबदारी निश्‍चित करुन, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply