पुणे : वानवडीत अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; दीड लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे : वानवडी भागात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे १० ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, दुचाकी असा तीन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मतीन हुसेन मेमन (वय २१, रा. सबेरा पार्क, कोंढवा), शाहरुख कादीर खान (वय २९, रा. युनिटी पार्क, कोंढवा), अनमोलसिंग मनचंदा सिंग (वय ३३, रा. साईद्वारका सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वानवडी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी  लुल्लानगर परिसरात दोन तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मेमन, खान यांना पकडले. चौकशीत साथीदार सिंग याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मेफेड्रोन, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, मनोज साळुंके, योगेश माेहिते, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के आदींनी ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply